1 1 आमच्या पित्याच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल, व आमचा बंधू तीमथ्य, ह्यांजकडून करिंथ येथील आमच्या पित्याच्या मंडळीला, तसेच सर्व अखया प्रांतातील सगळ्या पवित्र जनांना: 2 आमचा पिता व प्रभु येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हांला कृपा व शांती असो.
सर्व सांत्वनाचा पिता
3 आमचा पिता, म्हणजे आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता, कळवळ्याचा पिता व सर्व सांत्वनाचा पिता, धन्यवादित असो, 4 जो आमच्या सर्व दुःखांत आमचे सांत्वन करतो, ह्यासाठी की, आमच्या पित्याकडून आम्हांला जे सांत्वन मिळते त्याच सांत्वनाने आम्हीही इतरांचे त्यांच्या सर्व दुःखांत सांत्वन करू शकावे. 5 कारण जसे ख्रिस्ताचे दुःख आमच्यामध्ये विपुल होते, तसे ख्रिस्ताद्वारे आमचे सांत्वनही विपुल होते. 6 आम्ही दुःख भोगतो, तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी आहे; आमचे सांत्वन होते, तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे, आणि जे दुःख आम्ही भोगतो तेच दुःख तुम्ही सहन करत असता ते फलद्रूप होते. 7 तुमच्याविषयीची आमची आशा दृढ आहे, कारण आम्हांला माहीत आहे की, जसे तुम्ही दुःखांचे भागीदार आहात, तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
8 बंधुभगिनींनो, आशिया प्रांतात आम्हांला जे दुःख सोसावे लागले ते तुम्हांला कळावे अशी आमची इच्छा आहे: आमच्या शक्तीपलीकडे आम्ही असे भारले गेलो की, आम्ही जगण्याचीही आशा सोडून दिली. 9 खरे पाहता, आम्हांला मरणाची शिक्षा झाल्यासारखे वाटले, ह्यासाठी की, आम्ही स्वतःवर नव्हे, तर मेलेल्यांना उठवणाऱ्या आमच्या पित्यावर भरवसा ठेवावा. 10 त्याने आम्हांला अशा मरणाच्या संकटातून सोडवले, आणि तो पुन्हा सोडवील; तो आम्हांला सोडवीतच राहील अशी आशा आम्ही त्याच्यावर ठेवली आहे. 11 तुम्हीही आपल्या प्रार्थनांनी आम्हांला साहाय्य करत असता, ह्यासाठी की, पुष्कळांच्या प्रार्थनांद्वारे आम्हांला मिळालेल्या दानाबद्दल पुष्कळ जणांनी आमच्यासाठी उपकारस्तुती करावी.
पौलाच्या योजनेतील बदल
12 आमचा अभिमान हा आहे: आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष आहे की, आम्ही जगात—विशेषेकरून तुमच्याशी—आमच्या पित्याच्या पवित्रतेने व सरळपणाने वागलो; जगिक ज्ञानाने नव्हे, तर आमच्या पित्याच्या कृपेने वागलो. 13 तुम्ही जे वाचू शकता व समजूही शकता त्यावाचून आम्ही तुम्हांला दुसरे काही लिहीत नाही, आणि तुम्ही पूर्णपणे समजून घ्याल अशी माझी आशा आहे, 14 जसे तुम्ही आम्हांला अंशतः समजून घेतले आहे: आपल्या प्रभु येशूच्या दिवशी, जसा आम्ही तुमचा अभिमान बाळगू, तसा तुम्हीही आमचा अभिमान बाळगाल.
15 ह्या भरवशाने, मी आधी तुमच्याकडे येण्याचे योजिले, ह्यासाठी की, तुम्हांला दुसऱ्यांदा कृपा मिळावी. 16 मासेदोनियास जाताना तुम्हांला भेटावे, आणि मासेदोनियाहून पुन्हा तुमच्याकडे यावे, व तुम्ही मला यहूदीयाकडे पाठवून द्यावे, असे मी योजिले होते. 17 असे योजताना मी चंचलपणा केला काय? किंवा “होय, होय” आणि “नाही, नाही” असे एकाच वेळी म्हणत, मी देहानुसार योजना करतो काय? 18 आमचा पिता विश्वासू आहे तितक्याच निश्चयाने, तुमच्याशी बोललेले आमचे वचन “होय” व “नाही” असे नव्हते. 19 कारण सिल्वान, तीमथ्य व मी ह्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये गाजवलेला आमच्या पित्याचा पुत्र, येशू ख्रिस्त, “होय” व “नाही” असा नव्हता, तर त्याच्यामध्ये सदैव “होय” असाच होता. 20 आमच्या पित्याने केलेली अभिवचने कितीही असोत, ती त्याच्यामध्ये “होय” अशीच आहेत; म्हणून त्याच्याद्वारे आम्हीही आमच्या पित्याच्या गौरवासाठी “आमेन” म्हणतो.
21 आता जो आम्हांला तुमच्यासह ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हांला अभिषिक्त केले, तो आमचा पिता आहे, 22 ज्याने आम्हांवर शिक्काही मारला व येणाऱ्या गोष्टींचा विसार म्हणून आमच्या अंतःकरणांत आपला पवित्र आत्मा दिला. 23 मी माझ्या जिवावर आमच्या पित्याला साक्षी ठेवतो की, तुमची गय करावी म्हणून मी करिंथास परत आलो नाही. 24 आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता चालवतो असे नाही, तर तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमच्याबरोबर काम करतो, कारण तुम्ही विश्वासाने स्थिर आहात.