मी माझा जीव तुझ्याकडे उंचावतो
दाविदाचे स्तोत्र.
25 1 हे माझ्या पित्या, तुझ्याकडे मी माझा जीव उंचावतो.
2 हे माझ्या पित्या, मी तुझ्यावर भरवसा ठेवतो; मला लज्जित होऊ देऊ नकोस; माझ्या शत्रूंना माझ्यावर विजय मिळवू देऊ नकोस. 3 खरोखर, जे तुझी वाट पाहतात ते कोणीही लज्जित होणार नाहीत; विनाकारण विश्वासघात करणारे लज्जित होतील.
4 हे माझ्या पित्या, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटा मला शिकव. 5 तुझ्या सत्यात मला चालव आणि शिकव कारण तूच आमचा पिता, माझे तारण आहेस; दिवसभर मी तुझी वाट पाहतो. 6 हे माझ्या पित्या, तुझा कोमल कळवळा व तुझी प्रेमदया आठव, कारण त्या प्राचीन काळापासूनच्या आहेत. 7 माझ्या तारुण्यातील पापांची आठवण करू नकोस किंवा माझ्या बंडखोरींची; हे माझ्या पित्या, तुझ्या चांगुलपणासाठी तुझ्या प्रेमदयेप्रमाणे माझी आठवण कर.
8 आमचा पिता चांगला व सरळ आहे; म्हणून तो पाप्यांना मार्गाचे शिक्षण देतो. 9 तो नम्र जनांना न्यायात चालवतो, आणि नम्र जनांना आपला मार्ग शिकवतो. 10 आमच्या पित्याच्या सर्व वाटा प्रेमदया व विश्वासूपणा आहेत जे त्याचा करार व त्याच्या साक्षी पाळतात त्यांच्यासाठी.
11 हे माझ्या पित्या, तुझ्या नावासाठी माझ्या दुष्कर्माची क्षमा कर, कारण ते फार मोठे आहे. 12 आमच्या पित्याचे भय धरणारा मनुष्य कोण आहे? जो मार्ग त्याने निवडावा त्याचे शिक्षण तो त्याला देईल. 13 त्याचा जीव कल्याणात राहील, आणि त्याची संतती देश वतन म्हणून मिळवील. 14 आमच्या पित्याची घनिष्ठ मैत्री त्याचे भय धरणाऱ्यांसाठी आहे आणि तो त्यांना आपला करार कळवतो. 15 माझे डोळे सदैव आमच्या पित्याकडे लागले आहेत, कारण तो माझे पाय जाळ्यातून सोडवील.
16 माझ्याकडे वळ आणि कृपा कर माझ्यावर, कारण मी एकाकी व पीडित आहे. 17 माझ्या हृदयाचे क्लेश वाढले आहेत; माझ्या संकटातून मला बाहेर काढ. 18 माझ्या पीडेकडे व माझ्या कष्टांकडे पाहा, आणि माझी सर्व पापे दूर कर. 19 माझ्या शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत, आणि ते हिंसक द्वेषाने माझा द्वेष करतात.
20 माझ्या जिवाचे रक्षण कर आणि सोडव मला; मला लज्जित होऊ देऊ नकोस, कारण मी तुझा आश्रय घेतो. 21 सात्त्विकता व सरळपणा माझे रक्षण करोत कारण मी तुझी वाट पाहतो.
22 हे आमच्या पित्या, इस्राएलाला त्याच्या सर्व संकटांतून खंडून सोडव.