चोरी आणि भरपाई
22 1 जो कोणी बैल किंवा मेंढरू चोरून त्याला मारतो किंवा विकतो, त्याने बैलाबद्दल पाच गुरे आणि मेंढराबद्दल चार मेंढरे भरून द्यावीत. 2 जर चोर घर फोडताना पकडला जाऊन मारला गेला, तर त्याच्या रक्ताचा दोष लागत नाही. 3 पण जर सूर्य उगवल्यावर हे घडले, तर त्याच्या रक्ताचा दोष लागतो. त्याने भरपाई करावी; जर त्याच्याजवळ काही नसेल, तर त्याच्या चोरीबद्दल त्याला विकावे. 4 जर चोरलेले जनावर—बैल, गाढव किंवा मेंढरू—त्याच्याजवळ जिवंत सापडले, तर त्याने दुप्पट भरून द्यावे.
5 जर कोणी आपली गुरे मोकळी सोडली आणि ती दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरली, तर त्याने आपल्या शेतातील व द्राक्षमळ्यातील उत्तम ते देऊन भरपाई करावी.
6 जर आग पसरून काटेरी झुडपांना लागली आणि रचलेले धान्य, उभे पीक किंवा शेत जळाले, तर ज्याने आग लावली त्याने पूर्ण भरपाई करावी.
7 जर कोणी आपल्या शेजाऱ्याजवळ रुपे किंवा वस्तू सांभाळायला ठेवल्या आणि त्या त्याच्या घरातून चोरीला गेल्या, तर चोर—पकडला गेल्यास—दुप्पट भरून देईल. 8 जर चोर सापडला नाही, तर घरधन्याने आमच्या पित्यासमोर यावे, यासाठी की त्याने आपल्या शेजाऱ्याची मालमत्ता घेतली की नाही हे ठरावे. 9 बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा हरवलेली कोणतीही वस्तू आपली आहे असा दावा करून वाद उद्भवल्यास, दोघांनीही आमच्या पित्यासमोर यावे; आमचा पिता ज्याला दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला दुप्पट भरून द्यावे.
10 जर कोणी आपल्या शेजाऱ्याला गाढव, बैल, मेंढरू किंवा कोणतेही जनावर सांभाळायला दिले आणि ते मेले, जखमी झाले किंवा कोणी न पाहता नेले गेले, 11 तर त्या दोघांमधील प्रकरण माझ्यासमोर घेतलेल्या शपथेने निकालात निघावे: राखणाऱ्याने आपल्या शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही. मालक ते मान्य करील; भरपाई देय नाही. 12 पण जर ते जनावर खरोखरच त्याच्याकडून चोरीला गेले असेल, तर त्याने त्याच्या मालकाला भरपाई करावी. 13 जर ते फाडून टाकले गेले असेल, तर त्याने ते पुरावा म्हणून आणावे; फाडलेल्या जनावराबद्दल तो काही देणे लागत नाही.
14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून जनावर उसने घेतले आणि मालक जवळ नसताना ते जखमी झाले किंवा मेले, तर पूर्ण भरपाई करावी लागेल. 15 जर त्याचा मालक त्याच्याबरोबर होता, तर तो काही देणे लागत नाही; जर ते जनावर भाड्याने घेतले असेल, तर भाडे त्या नुकसानाची भरपाई करते.
एका तरुणीचा मान
16 जर एखाद्या पुरुषाने वाग्दत्त नसलेल्या कुमारीला भुलवून तिच्याशी संग केला, तर त्याने वधूमूल्य देऊन तिच्याशी लग्न करावे. a a v16 वधूमूल्य म्हणजे लग्नाच्या वेळी वधूच्या पित्याला दिली जाणारी रूढीप्रमाणे रक्कम होय. 17 जर तिच्या पित्याने तिला त्याला देण्यास साफ नकार दिला, तर त्याने कुमारींच्या वधूमूल्याइतके रुपे तोलून द्यावे.
18 चेटकीण करणारीला जिवंत राहू देऊ नकोस.
19 जो कोणी जनावराशी शरीरसंबंध ठेवतो त्याला अवश्य जिवे मारावे.
20 जो कोणी केवळ माझ्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही देवाला यज्ञ अर्पण करतो त्याचा संपूर्ण नाश करावा.
21 परदेशी माणसावर अन्याय करू नकोस किंवा त्याला जाचू नकोस, कारण तुम्ही मिसर देशात परदेशी होता.
22 कोणत्याही विधवेला किंवा अनाथाला जाच करू नकोस. 23 जर तू त्यांना जाच केलास आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी अवश्य त्यांचा धावा ऐकेन. 24 माझा क्रोध भडकेल; मी तुम्हांला तलवारीने मारीन — तुमच्या बायका विधवा होतील, तुमची मुले अनाथ होतील.
25 जर तू माझ्या लोकांना, तुझ्यामधील गरिबाला, पैसे उसने दिलेस, तर त्याच्याशी सावकारासारखा वागू नकोस किंवा त्याच्याकडून व्याज घेऊ नकोस. 26 जर तू आपल्या शेजाऱ्याचा झगा तारण म्हणून घेतलास, तर सूर्यास्तापूर्वी तो त्याला परत कर, 27 कारण तेच त्याचे एकमेव आच्छादन आहे, त्याच्या अंगावरचा त्याचा झगा आहे. तो कशात झोपेल? जेव्हा तो माझा धावा करील, तेव्हा मी ऐकेन, कारण मी कळवळा दाखवणारा आहे.
28 तू आमच्या पित्याविषयी वाईट बोलू नकोस, किंवा तुझ्या लोकांच्या अधिपतीला शाप देऊ नकोस.
29 तुझ्या शेतातील समृद्ध पीक व तुझा रस देण्यास विलंब करू नकोस. तुझ्या पुत्रांतील ज्येष्ठ पुत्र मला दे. 30 तुझ्या बैलाबाबत व मेंढराबाबतही तसेच कर: ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू दे, मग आठव्या दिवशी ते मला दे.
31 तुम्ही माझ्यासाठी पवित्र लोक व्हा. रानात हिंस्र पशूंनी फाडलेले मांस खाऊ नका—ते कुत्र्यांना टाकून द्या.