यरुशलेमेच्या नाशाची बातमी येते
1 1 हकल्याचा पुत्र नहेम्या याचे शब्द. विसाव्या वर्षी, किसलेव महिन्यात, मी शूशन राजवाड्यात होतो, a a v1 किसलेव हा इब्री दिनदर्शिकेतील नववा महिना होता, जो नोव्हेंबरच्या शेवटी ते डिसेंबरमध्ये येतो.
2 माझ्या भावांपैकी एक हनानी, यहूदातील काही माणसांसह आला. बंदिवासातून वाचून राहिलेल्या, निर्वासनातून उरलेल्या यहूदी लोकांविषयी आणि यरुशलेमेविषयी मी त्यांना विचारले. 3 ते मला म्हणाले, “बंदिवासातून वाचून राहिलेले लोक तेथे प्रांतात मोठ्या संकटात व अपमानात आहेत. यरुशलेमेची भिंत मोडून पडली आहे, आणि तिचे दरवाजे अग्नीने जळून गेले आहेत.”
4 हे शब्द ऐकून मी बसून रडलो, आणि कित्येक दिवस शोक करीत, उपवास करीत व आमच्या स्वर्गीय पित्यासमोर प्रार्थना करीत राहिलो. 5 मी म्हणालो: हे माझ्या स्वर्गीय पित्या, हे महान व भयप्रद देवा, तू आपल्यावर प्रीती करणाऱ्या व आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांसाठी करार व प्रेमदया राखतोस; 6 तुझा कान लक्ष देणारा व तुझे डोळे उघडे असोत, म्हणजे तुझा सेवक मी जी प्रार्थना तुझ्यासमोर आता रात्रंदिवस तुझे सेवक इस्राएल लोकांसाठी करीत आहे ती तू ऐकावीस—आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुद्ध केलेल्या पापांची कबुली मी देत आहे. मी व माझ्या वडिलांच्या घराण्याने पाप केले आहे. 7 आम्ही तुझ्याविरुद्ध फार दुष्टपणे वागलो आहोत; तू आपला सेवक मोशे याला दिलेल्या आज्ञा, विधी व नियम आम्ही पाळले नाहीत.
8 कृपया आपला सेवक मोशे याला तू दिलेली आज्ञा आठव: जर तुम्ही अविश्वासू झालात, तर मी तुम्हांला राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन, 9 पण जर तुम्ही माझ्याकडे परत आलात, माझ्या आज्ञा पाळल्यात व त्या आचरणात आणल्यात, तर तुमचे बंदिवान आकाशाच्या शेवटच्या टोकाला असले तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन आणि माझे नाव वसविण्यासाठी मी निवडलेल्या ठिकाणी त्यांना आणीन.
10 ते तुझे सेवक, तुझे लोक आहेत, ज्यांना तू आपल्या महान सामर्थ्याने व आपल्या बळकट हाताने मुक्त केलेस. 11 हे माझ्या सार्वभौम पित्या, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व तुझ्या सेवकांच्या—ज्यांना तुझ्या नावाचे भय बाळगण्यात आनंद वाटतो त्यांच्या—प्रार्थनेकडे तुझा कान लक्ष देवो. आज तुझ्या सेवकाला यश दे, आणि या मनुष्यासमोर त्याच्यावर दया कर. त्या वेळी मी राजाचा प्यालेवाहक होतो.