एस्तेर राजाच्या सिंहासनासमोर येते
5 1 तिसऱ्या दिवशी एस्तेरने राजवस्त्रे धारण केली आणि राजमहालाच्या आतल्या अंगणात, राजाच्या दरबारासमोर उभी राहिली; तेथे राजा प्रवेशद्वाराकडे तोंड करून आपल्या राजसिंहासनावर बसला होता. 2 राणी एस्तेर अंगणात उभी असलेली पाहून राजाची तिच्यावर मर्जी झाली आणि त्याने आपल्या हातातील सोन्याचा राजदंड तिच्याकडे पुढे केला. एस्तेर जवळ आली आणि तिने राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला.
3 राजाने विचारले, “काय झाले, राणी एस्तेर? तुझी काय मागणी आहे? अगदी अर्धे राज्यसुद्धा तुला दिले जाईल.”
4 एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल, तर मी तयार केलेल्या मेजवानीस राजा व हामान यांनी आज यावे.”
5 राजा म्हणाला, “एस्तेरच्या इच्छेप्रमाणे व्हावे म्हणून हामानाला लवकर घेऊन या.” मग राजा व हामान एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीस आले.
6 द्राक्षारस पिताना राजाने विचारले, “एस्तेर, तुझी विनंती काय आहे? ती मान्य केली जाईल. तुझी मागणी—अगदी अर्धे राज्य असले तरी—ती तुझी होईल.”
7 एस्तेरने उत्तर दिले, “माझी विनंती व माझी मागणी हीच आहे: 8 राजाची माझ्यावर मर्जी झाली असेल आणि माझी विनंती मान्य करून माझी मागणी पूर्ण करणे राजाला आवडत असेल, तर मी त्यांच्यासाठी तयार करीन त्या मेजवानीस राजा व हामान यांनी यावे. उद्या मी राजाच्या म्हणण्याप्रमाणे करीन.”
हामानाचा राग मर्दखयाविरुद्ध पेटतो
9 त्या दिवशी हामान आनंदित व प्रफुल्लित होऊन निघाला. पण राजाच्या दाराशी मर्दखय आपल्यापुढे उठला नाही व थरथरलाही नाही, हे पाहून हामान मर्दखयावर संतापाने भडकला. 10 तरीही हामानाने स्वतःला आवरले आणि तो घरी गेला. त्याने आपल्या मित्रांना व आपली पत्नी जेरेश हिला बोलावून घेतले, 11 आणि हामानाने त्यांना आपल्या संपत्तीचे वैभव, आपले पुष्कळ पुत्र, आणि राजाने आपल्याला कसे बहुमान देऊन राजाच्या अधिकाऱ्यांहून व सेवकांहून वरचढ केले, हे सर्व सांगितले.
12 हामान पुढे म्हणाला, “राणी एस्तेरने राजाबरोबर फक्त मलाच आपल्या मेजवानीस बोलावले होते, आणि उद्याही राजाबरोबर मलाच बोलावले आहे. 13 पण जोपर्यंत तो यहूदी मर्दखय राजाच्या दाराशी बसलेला मला दिसतो, तोपर्यंत या सर्वांचा मला काहीच उपयोग नाही.”
14 तेव्हा त्याची पत्नी जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, “पंच्याहत्तर फूट उंच एक खांब उभारायला लाव. सकाळी राजाला विनंती कर, की मर्दखयाला त्यावर टांगावे. मग आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा.” हामानाला हे आवडले आणि त्याने तो खांब उभारला.