1 1 पौल, सिल्वान व तीमथ्य, यांजकडून आमचा पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांच्यामधील थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला: 2 आमचा पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांला कृपा व शांती असो.
तुमच्या वाढत्या विश्वासाबद्दल आभार
3 बंधुभगिनींनो, तुमच्यासाठी आम्ही आमच्या पित्याचे नेहमी आभार मानले पाहिजेत — आणि हे योग्यच आहे — कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हां प्रत्येकाचे एकमेकांवरील प्रेम अधिक वाढत आहे. 4 म्हणून तुमच्या सोसलेल्या सर्व छळांत व दुःखांत तुम्ही दाखवलेल्या सहनशीलतेबद्दल व विश्वासाबद्दल आम्ही स्वतः आमच्या पित्याच्या मंडळ्यांमध्ये तुमच्याविषयी अभिमानाने बोलतो.
5 हे आमच्या पित्याच्या न्याय्य निवाड्याचे प्रमाण आहे, की तुम्ही आमच्या पित्याच्या राज्यास योग्य गणले जावे, ज्याच्यासाठी तुम्ही दुःखही सोसता. 6 कारण आमचा पिता न्यायी आहे, तो तुम्हांला त्रास देणाऱ्यांना त्रासाची परतफेड करील, 7 आणि तुम्हां दुःख सोसणाऱ्यांना आमच्याबरोबर विसावा देईल, जेव्हा प्रभु येशू आपल्या सामर्थ्यशाली दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल, 8 धगधगत्या अग्नीत, जे आमच्या पित्याला ओळखत नाहीत आणि जे आपल्या प्रभु येशूच्या सुवार्तेचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर न्याय आणीत. 9 ते प्रभूच्या समक्षतेपासून व त्याच्या तेजस्वी सामर्थ्यापासून दूर, सार्वकालिक नाशाचा दंड भोगतील, 10 त्या दिवशी, जेव्हा तो आपल्या पवित्र जनांमध्ये गौरविला जाण्यासाठी आणि विश्वास ठेवणाऱ्या सर्वांमध्ये प्रशंसिला जाण्यासाठी येईल — कारण तुमच्याविषयीच्या आमच्या साक्षीवर विश्वास ठेवला गेला.
11 यासाठी आम्ही तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करतो, की आमच्या पित्याने तुम्हांला त्याच्या पाचारणास योग्य गणावे आणि आपल्या सामर्थ्याने चांगल्याची प्रत्येक इच्छा व विश्वासाचे प्रत्येक कार्य पूर्ण करावे, 12 म्हणजे आमच्या पित्याच्या व प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेने आपल्या प्रभु येशूचे नाव तुमच्यामध्ये गौरविले जावे आणि तुम्ही त्याच्यामध्ये गौरविले जावे.