5 1 आता, बंधुभगिनींनो, काळ आणि समयांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही. 2 कारण रात्री चोर येतो तसा आपल्या प्रभु येशूचा दिवस येतो, हे तुम्ही स्वतः चांगले जाणता. 3 जेव्हा लोक म्हणतील, “शांती आणि सुरक्षितता,” तेव्हा गरोदर स्त्रीला प्रसववेदना येतात तसा त्यांच्यावर अचानक नाश येईल, आणि ते सुटणार नाहीत. 4 पण बंधुभगिनींनो, तो दिवस चोरासारखा तुम्हांला अकस्मात गाठावा, असे तुम्ही अंधारात नाही. 5 तुम्ही सर्व प्रकाशाची व दिवसाची मुले आहात; आपण रात्रीचे किंवा अंधाराचे नाही. 6 म्हणून, इतरांसारखे आपण झोपू नये, तर जागृत व सावध राहावे. 7 कारण जे झोपतात ते रात्री झोपतात, आणि जे धुंद होतात ते रात्री धुंद होतात. 8 पण आपण दिवसाचे असल्यामुळे, विश्वास व प्रीती हे उरस्त्राण आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण घालून सावध राहू या. 9 कारण आमच्या पित्याने आपल्याला क्रोधासाठी नव्हे, तर आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळवण्यासाठी नेमले आहे. 10 तो आपल्यासाठी मरण पावला, यासाठी की आपण जागे असू किंवा झोपलेले असू, आपण त्याच्यासोबत जगावे. 11 म्हणून, तुम्ही जसे करत आहात तसेच एकमेकांना उत्तेजन द्या व एकमेकांची उन्नती करा.
प्रकाशाची मुले म्हणून जगणे
12 बंधुभगिनींनो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, जे तुमच्यामध्ये कष्ट करतात, प्रभूमध्ये तुम्हांला मार्गदर्शन करतात व तुम्हांला बोध करतात, त्यांचा आदर करा; 13 त्यांच्या कामासाठी प्रीतीने त्यांना अत्यंत मान द्या. एकमेकांशी शांतीने राहा.
14 बंधुभगिनींनो, आम्ही तुम्हांला आग्रह करतो: आळशांना बोध करा, निराश झालेल्यांना धीर द्या, दुर्बलांना आधार द्या, सर्वांशी सहनशील राहा. 15 पाहा, कोणीही कोणाची वाईटाबद्दल वाईट फेड करू नये, तर एकमेकांचे व सर्वांचे नेहमी बरे व्हावे म्हणून झटा.
16 सदैव आनंद करा, 17 प्रार्थना करण्याचे कधीही थांबवू नका, 18 प्रत्येक गोष्टीत उपकारस्तुती करा; कारण ख्रिस्त येशूमध्ये तुमच्याविषयी आमच्या पित्याची हीच इच्छा आहे. 19 पवित्र आत्म्याला विझवू नका. 20 भविष्यवाण्यांना तुच्छ मानू नका, 21 तर सर्व गोष्टींची परीक्षा करा; जे चांगले ते धरून ठेवा. 22 प्रत्येक प्रकारच्या वाईटापासून दूर राहा.
23 शांतीचा आमचा पिता स्वतः तुम्हांला पूर्णपणे पवित्र करो, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी तुमचा संपूर्ण आत्मा, जीव व शरीर निर्दोष राखले जावो. 24 जो तुम्हांला बोलावतो तो विश्वासू आहे; तो हे खचित घडवून आणील.
25 बंधुभगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
26 सर्व बंधुभगिनींना पवित्र चुंबनाने सलाम करा. 27 हे पत्र सर्व बंधुभगिनींना वाचून दाखवावे, अशी मी तुम्हांला प्रभूसमोर आज्ञा करतो.
28 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर असो.