देवदूताची घोषणा
18 1 यानंतर मी दुसरा एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला; त्याच्याजवळ मोठा अधिकार होता, आणि त्याच्या तेजाने पृथ्वी उजळून निघाली. 2 तो मोठ्याने ओरडला: “पडली, पडली—महान बाबेल! ती भुतांचे निवासस्थान झाली आहे, प्रत्येक अशुद्ध आत्म्याचे आणि अशुद्ध व तिरस्करणीय पक्ष्यांचे आश्रयस्थान झाली आहे.” 3 कारण सर्व राष्ट्रांनी प्याला आहे तो द्राक्षारस तिच्या व्यभिचाराच्या उन्मादाचा; पृथ्वीच्या राजांनी व्यभिचार केला तिच्याशी, आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्या विलासाच्या सामर्थ्याने धनवान झाले.”
4 मग मी स्वर्गातून दुसरी वाणी ऐकली: “माझ्या लोकांनो, तिच्यातून बाहेर या, यासाठी की तुम्ही तिच्या पापांचे भागीदार होऊ नये आणि तिच्या पीडा तुम्हांवर येऊ नयेत;
5 कारण तिची पापे स्वर्गाइतकी उंच साचली आहेत, आणि आमच्या पित्याने तिच्या दुष्कृत्यांची आठवण केली आहे. 6 तिने जसे दिले तसे तिला परत द्या, आणि तिने केलेल्या कृत्यांची तिला दुप्पट फेड करा; तिने ज्या प्याल्यात मिसळले, त्यात तिच्यासाठी दुप्पट वाटा मिसळा. 7 जशी तिने स्वतःचा गौरव केला आणि विलासात राहिली, तशीच तिला यातना व शोक तितक्याच मापाने द्या; कारण ती आपल्या मनात म्हणते, ‘मी राणी होऊन सिंहासनावर बसले आहे; मी विधवा नाही, आणि मला कधीच शोक दिसणार नाही.’ 8 याकारणाने तिच्या पीडा एकाच दिवसात येतील — मृत्यू, शोक व दुष्काळ — आणि ती अग्नीने जाळून टाकली जाईल; कारण जिने तिचा न्याय केला तो आमचा पिता समर्थ आहे
9 पृथ्वीचे जे राजे तिच्याशी व्यभिचारात पडले आणि तिच्याबरोबर विलासात राहिले, ते तिच्या जळण्याचा धूर पाहून तिच्यासाठी रडतील व शोक करतील. 10 तिच्या यातनेच्या भीतीने दूर उभे राहून ते म्हणतील: “हाय, हाय, महान नगरी, बाबेल, बलाढ्य नगरी! एका घटकेत तुझा न्याय आला.” 11 पृथ्वीचे व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणीही विकत घेत नाही. 12 सोने, चांदी, रत्ने, मोत्ये, तलम तागाचे कापड, जांभळे वस्त्र, रेशीम, किरमिजी वस्त्र; सर्व प्रकारचे सुगंधी लाकूड, हस्तिदंताच्या सर्व वस्तू, मौल्यवान लाकूड, पितळ, लोखंड व संगमरवर यांचा माल. 13 दालचिनी, मसाले, धूप, गंधरस, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, मैदा, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, आणि माणसांची शरीरे व जीव. 14 तुझ्या जिवाने ज्या पिकलेल्या फळांची लालसा धरली, ती तुझ्यापासून निघून गेली; तुझी सर्व संपत्ती व वैभव नाहीसे झाले, ते पुन्हा कधीही सापडणार नाही. 15 या वस्तूंचे जे व्यापारी तिच्यामुळे धनवान झाले, ते तिच्या यातनेच्या भीतीने दूर उभे राहतील, रडत व शोक करत 16 आणि म्हणतील: “हाय, हाय, त्या महान नगरीवर, जी तलम तागाचे, जांभळे व किरमिजी वस्त्र नेसलेली आणि सोन्याने, रत्नांनी व मोत्यांनी सजलेली होती! एका घटकेत एवढी संपत्ती उद्ध्वस्त झाली.” 17 आणि प्रत्येक जहाजाचा कप्तान, समुद्रावर प्रवास करणारा प्रत्येक जण, खलाशी, आणि समुद्रावर उपजीविका करणारे सर्व दूर उभे राहिले 18 आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते ओरडले: “या महान नगरीसारखी कोणती नगरी कधी होती?” 19 त्यांनी आपल्या डोक्यावर धूळ उधळली, आणि रडत व शोक करत ओरडले: “हाय, हाय, त्या महान नगरीवर, जिच्या समृद्धीने समुद्रात जहाजे असणारे सर्व धनवान झाले! एका घटकेत ती उद्ध्वस्त झाली.” 20 हे स्वर्गा, तिच्यावर आनंद कर, आणि तुम्ही पवित्र जन, प्रेषित व संदेष्टे! कारण आमच्या पित्याने तिच्याविरुद्ध तुमच्या वतीने न्याय केला आहे.
21 एका बलाढ्य देवदूताने मोठ्या जात्याच्या दगडासारखा एक धोंडा समुद्रात फेकून दिला आणि म्हणाला: “अशाच रीतीने बाबेल ही महान नगरी जोराने खाली टाकली जाईल, आणि ती पुन्हा कधीही सापडणार नाही.” 22 वीणा वाजवणारे व गायक यांचा आवाज, बासरी वाजवणारे व कर्णा फुंकणारे यांचा, तुझ्यात पुन्हा कधीही ऐकू येणार नाही. कोणत्याही कारागिरीचा कारागीर तुझ्यात पुन्हा कधीही आढळणार नाही. जात्याचा आवाज तुझ्यात पुन्हा कधीही ऐकू येणार नाही. 23 दिव्याचा प्रकाश तुझ्यात पुन्हा कधीही चमकणार नाही. वर व वधू यांचा आवाज तुझ्यात पुन्हा कधीही ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते, आणि तुझ्या जादूटोण्याने सर्व राष्ट्रे फसवली गेली. 24 संदेष्ट्यांचे व पवित्र जनांचे रक्त, आणि पृथ्वीवर मारल्या गेलेल्या सर्वांचे रक्त तिच्यात सापडले.