खोल गर्तेतून
आरोहणाचे गीत.
130 1 खोल गर्तेतून मी तुला हाक मारतो, हे माझ्या पित्या.
2 हे सार्वभौम पित्या, माझी वाणी ऐक; माझ्या दयेसाठीच्या विनवण्यांकडे लक्षपूर्वक कान दे.
3 हे माझ्या पित्या, जर तू पापांची नोंद ठेवलीस, तर हे सार्वभौम पित्या, कोण टिकू शकेल? 4 परंतु तुझ्याजवळ क्षमा आहे, म्हणून तुझे भय धरले जावे.
5 मी वाट पाहतो माझ्या पित्याची; माझा जीव वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी माझी आशा ठेवतो. 6 पहारेकरी जितके सकाळची वाट पाहतात त्याहून अधिक माझा जीव सार्वभौम पित्याची वाट पाहतो, पहारेकरी सकाळची वाट पाहतात त्याहूनही अधिक.
7 हे इस्राएला, आमच्या पित्यावर आशा ठेव, कारण आमच्या पित्याजवळ करारमय प्रेम आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. 8 आणि तो स्वतः इस्राएलाला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करेल. a a v8 आपल्या लोकांना त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करण्याचे पित्याने दिलेले अभिवचन येशूमध्ये पूर्ण झाले आहे; त्याला हे नाव अशासाठी देण्यात आले की, तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील.