अंधारातील दाविदाची आरोळी
प्रमुख गायकासाठी; तंतुवाद्यांसह, शमीनीथच्या सुरात. दाविदाचे स्तोत्र.
6 1 हे माझ्या पित्या, तुझ्या रागाने मला धमकावू नकोस, आणि तुझ्या क्रोधाने मला शिक्षा करू नकोस. 2 हे माझ्या पित्या, माझ्यावर कृपा कर, कारण मी अशक्त आहे; हे माझ्या पित्या, मला बरे कर, कारण माझी हाडे भीतीने थरथरत आहेत.
3 माझा जीव भीतीने थरथरत आहे. पण तू, हे माझ्या पित्या — किती वेळ? 4 हे माझ्या पित्या, माझ्याकडे परत ये; माझा जीव सोडव. तुझ्या कराराच्या प्रेमामुळे मला तार.
5 कारण मृत्यूमध्ये तुझी आठवण होत नाही; कबरेत तुझी स्तुती कोण करील?
6 मी माझ्या कण्हण्याने थकून गेलो आहे. रात्रभर मी माझे अंथरूण अश्रूंनी भिजवतो; माझ्या रडण्याने ते ओलेचिंब करतो.
7 दुःखाने माझे डोळे क्षीण झाले आहेत; माझ्या सर्व शत्रूंमुळे ते थकून जातात. 8 अहो सर्व दुष्कर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा, कारण माझ्या पित्याने माझ्या रडण्याचा आवाज ऐकला आहे. 9 माझ्या पित्याने माझी दयेसाठीची विनवणी ऐकली आहे; माझा पिता माझी प्रार्थना स्वीकारतो. 10 माझे सर्व शत्रू लज्जित होतील आणि भीतीने थरथर कापतील; ते मागे फिरतील आणि अकस्मात फजित होतील.