दाविदाची आपल्या पित्याकडे आरोळी
दाविदाची प्रार्थना.
86 1 हे माझ्या पित्या, कान लववून माझे ऐक; मला उत्तर दे, कारण मी दीन व गरजवंत आहे.
2 माझ्या जिवाचे रक्षण कर, कारण मी तुला वाहिलेलो आहे; तुझ्यावर भरवसा ठेवणाऱ्या तुझ्या सेवकाला तार—तूच माझा पिता आहेस. 3 हे माझ्या सार्वभौम पित्या, माझ्यावर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा धावा करतो. 4 तुझ्या सेवकाच्या जिवाला आनंदित कर, कारण हे माझ्या सार्वभौम पित्या, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
5 कारण हे माझ्या सार्वभौम पित्या, तू चांगला व क्षमाशील आहेस; तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर तुझी कराराची प्रीती विपुल आहे. 6 हे माझ्या पित्या, माझी प्रार्थना ऐक; माझ्या दयेसाठीच्या विनवण्यांकडे कान दे. 7 संकटाच्या दिवशी मी तुझा धावा करतो, आणि तू मला उत्तर देतोस.
8 देवांमध्ये तुझ्यासारखा कोणी नाही, हे माझ्या सार्वभौम पित्या, आणि तुझ्या कृत्यांसारखी कृत्ये नाहीत. 9 तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील, हे माझ्या सार्वभौम पित्या, आणि तुझ्या नावाचे गौरव करतील. 10 कारण तू महान आहेस व अद्भुत कृत्ये करतोस; तूच एकटा माझा पिता आहेस.
11 हे माझ्या पित्या, तुझा मार्ग मला शिकव, म्हणजे मी तुझ्या सत्यात चालेन; मला अखंड हृदय दे म्हणजे मी तुझ्या नावाचे भय बाळगेन. 12 हे माझ्या सार्वभौम पित्या, मी संपूर्ण मनाने तुझी स्तुती करेन, आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करेन. 13 कारण माझ्यावरील तुझी कराराची प्रीती थोर आहे; तू माझा जीव अधोलोकाच्या खोल तळातून सोडवला आहेस. a a v13 अधोलोक (शौल) हे मृतांच्या निवासस्थानाचे इब्री नाव आहे; कल्पना करता येईल अशा सर्वांत खोल ठिकाणाच्या रूपात त्याचे चित्रण केले आहे.
14 हे माझ्या पित्या, उद्धट माणसे माझ्याविरुद्ध उठली आहेत; क्रूर माणसांची टोळी माझ्या जिवावर टपली आहे, आणि ते तुझा विचारही करत नाहीत. 15 पण हे माझ्या सार्वभौम पित्या, तू कनवाळू व कृपाळू पिता आहेस, मंदक्रोध आणि कराराची प्रीती व सत्यता यांनी विपुल आहेस. 16 माझ्याकडे वळ आणि माझ्यावर कृपा कर; तुझ्या सेवकाला तुझे सामर्थ्य दे, आणि तुझ्या दासीच्या मुलाला तार. 17 तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह मला दाखव, म्हणजे माझा द्वेष करणारे ते पाहून लज्जित होतील, कारण हे माझ्या पित्या, तू मला साहाय्य केले व सांत्वन दिले आहेस.