तो सिंहासनावर विराजमान आहे
99 1 आमचा पिता राज्य करतो; लोकांनी थरथर कापावे! तो करूबांवर सिंहासनावर विराजमान आहे; पृथ्वी डळमळो! 2 सीयोनेत आमचा पिता महान आहे; तो सर्व लोकांहून उंच केला गेला आहे. 3 त्यांनी तुझ्या महान व भयप्रद नावाची स्तुती करावी; तो पवित्र आहे!
4 पराक्रमी राजा न्यायावर प्रीती करतो. तू योग्यता स्थापिली आहेस; तू न्याय घडवून आणला आहेस आणि याकोबात नीतिमत्ता घडवून आणली आहेस. 5 आमच्या पित्याला उंच करा; त्याच्या पादासनापुढे उपासना करा! तो पवित्र आहे!
6 मोशे व अहरोन त्याच्या याजकांमध्ये होते, आणि शमुवेल त्याच्या नावाचा धावा करणाऱ्यांमध्ये होता. त्यांनी आमच्या पित्याला हाक मारली, आणि त्याने त्यांना उत्तर दिले. 7 मेघस्तंभातून तो त्यांच्याशी बोलला; त्यांनी त्याच्या आज्ञा व त्याने दिलेले नियम पाळले.
8 आमच्या पित्या, तू उत्तर दिलेस त्यांना; तू त्यांच्यासाठी क्षमा करणारा पिता होतास, तरीही तू त्यांच्या दुष्कृत्यांचा जाब त्यांच्याकडून घेतलास. 9 आमच्या पित्याला उंच करा, आणि त्याच्या पवित्र पर्वतावर उपासना करा; कारण आमचा पिता पवित्र आहे!