तू मला सांत्वन दिले आहेस
12 1 आणि त्या दिवशी तू म्हणशील: “मी स्तुती करीन तुझी, हे माझ्या पित्या; कारण तू रागावला होतास, तरी तुझा राग माझ्यावरून निवळला आहे, आणि तू मला सांत्वन दिले आहेस. 2 पाहा, आमचा पिता माझे तारण आहे; मी भरवसा ठेवीन आणि भिणार नाही, कारण माझा पिता माझे सामर्थ्य व माझे गीत आहे; तो माझे तारण झाला आहे. 3 तुम्ही आनंदाने तारणाच्या विहिरींतून पाणी काढाल. 4 आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “आमच्या पित्याचे उपकारस्तवन करा, त्याच्या नावाचा धावा करा, त्याची कृत्ये सर्व लोकांना सांगा, त्याचे नाव थोर आहे असे जाहीर करा. 5 आमच्या पित्यासाठी गा, कारण त्याने महान कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीभर कळू द्या. 6 हे सीयोनरहिवाशी, मोठ्याने जयघोष कर आणि आनंदाने गा, कारण इस्राएलाचा पवित्र — आमचा पिता — तुझ्यामध्ये थोर आहे.