वचन मुक्तपणे धावावे म्हणून प्रार्थना करा
3 1 शेवटी, बंधुभगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा की, आमच्या प्रभु येशूचे वचन, जसे तुमच्यामध्ये झाले तसे, वेगाने पुढे धावावे व त्याचा सन्मान व्हावा, 2 आणि आम्ही कुटिल व दुष्ट माणसांपासून सोडवले जावे; कारण सर्वच जण विश्वास ठेवणारे नाहीत. 3 पण प्रभु विश्वासू आहे; तोच तुम्हांला बळकट करील व त्या दुष्टापासून तुमचे रक्षण करील. 4 आम्ही जे आज्ञापितो ते तुम्ही करत आहात व करत राहाल, अशी प्रभूमध्ये आमची खात्री आहे. 5 प्रभु तुमची अंतःकरणे आमच्या पित्याच्या प्रेमात आणि ख्रिस्ताच्या धीरामध्ये चालवो.
आळशीपणाविरुद्ध ताकीद
6 बंधुभगिनींनो, आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही तुम्हांला आज्ञा करतो: तुम्हांला आमच्याकडून मिळालेल्या परंपरेविरुद्ध जो प्रत्येक बंधू आळशीपणात जगतो, त्याच्यापासून दूर राहा. 7 तुम्ही आमचे अनुकरण कसे करावे हे तुम्ही स्वतःच जाणता; कारण आम्ही तुमच्यामध्ये आळशी नव्हतो. 8 आम्ही कोणाचेही अन्न फुकट खाल्ले नाही; उलट, तुमच्यापैकी कोणावरही भार पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कष्ट व श्रम करत काम केले. 9 असे नाही की आम्हांला अधिकार नव्हता, तर तुम्ही अनुकरण करावे म्हणून आम्ही स्वतःला तुमच्यापुढे आदर्श ठेवले. 10 आम्ही तुमच्याजवळ होतो तेव्हाही आम्ही तुम्हांला ही आज्ञा दिली होती: जर कोणी काम करण्यास नाकारतो, तर त्याने खाऊही नये. 11 कारण आम्ही ऐकतो की, तुमच्यापैकी काही जण आळशीपणात जगत आहेत; ते कामात गुंतलेले नसून लुडबूड करणारे आहेत. 12 अशा माणसांना आम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या ठायी आज्ञा करतो व आग्रह करतो: त्यांनी शांतपणे काम करून स्वतःची भाकर खावी. 13 पण, बंधुभगिनींनो, तुम्ही चांगले करण्यात थकून जाऊ नका. 14 जर कोणी या पत्रातील आमच्या वचनाचे पालन करत नाही, तर त्याला ध्यानात ठेवा आणि त्याच्याशी संबंध ठेवू नका, म्हणजे त्याला लाज वाटेल. 15 तरीही त्याला शत्रू मानू नका, तर बंधू म्हणून त्याला ताकीद द्या.
शांती, अभिवादन आणि कृपा
16 आता शांतीचा प्रभु स्वतः तुम्हांला सर्व प्रकारे, सदैव शांती देवो. प्रभु तुम्हा सर्वांबरोबर असो.
17 मी, पौल, हे अभिवादन माझ्या स्वतःच्या हाताने लिहितो — माझ्याकडून येणारे प्रत्येक पत्र खरे असल्याची हीच खूण आहे; मी असेच लिहितो. 18 आमचा प्रभु येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.