14 1 स्त्रीपासून जन्मलेला मनुष्य, अल्पायुषी आणि क्लेशांनी भरलेला असतो. 2 तो फुलासारखा उगवतो आणि कोमेजतो; तो सावलीसारखा पळून जातो आणि टिकत नाही. 3 अशा माणसावर तू आपली दृष्टी लावतोस काय? आणि तू मला आपल्यासोबत न्यायात आणतोस काय? 4 अशुद्धातून शुद्ध वस्तू कोण काढू शकेल? कोणीही नाही. 5 त्याचे दिवस ठरलेले असल्यामुळे, त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्यापाशी आहे, आणि तू अशा मर्यादा ठरवल्या आहेस ज्या तो ओलांडू शकत नाही, 6 त्याच्यापासून दृष्टी वळव, म्हणजे त्याला विसावा मिळेल, जोपर्यंत मजुरासारखा तो आपला दिवस पुरा करत नाही.
7 कारण झाडाला आशा असते: जर ते तोडले, तरी ते पुन्हा फुटेल, आणि त्याचे कोंब खुंटणार नाहीत. 8 जरी त्याचे मूळ जमिनीत जुने झाले आणि त्याचा बुंधा मातीत मेला, 9 पाण्याच्या वासाने ते अंकुरेल आणि नव्या रोपासारखे फांद्या फुटेल. 10 पण मनुष्य मरतो आणि पडून राहतो; माणूस शेवटचा श्वास घेतो, आणि तो कोठे असतो? 11 जसे सरोवरातून पाणी नाहीसे होते, आणि नदी आटून सुकून जाते, 12 तसा मनुष्य पडून राहतो आणि उठत नाही; जोपर्यंत आकाश नाहीसे होत नाही, तोपर्यंत तो जागा होणार नाही किंवा आपल्या झोपेतून उठवला जाणार नाही.
13 अहो, तू मला कबरेत लपवशील तर, तुझा राग ओसरेपर्यंत मला दडवशील तर, ठराविक वेळ नेमशील माझ्यासाठी, आणि माझी आठवण करशील तर किती बरे होईल! 14 मनुष्य मेला, तर तो पुन्हा जगेल काय? माझ्या कठीण सेवेच्या सर्व दिवसांत मी वाट पाहीन, जोपर्यंत माझे नूतनीकरण येत नाही. 15 तू हाक मारशील, आणि मी उत्तर देईन तुला; तुझ्या हातांच्या कामाची तुला ओढ लागेल. 16 कारण तेव्हा तू माझी पावले मोजशील; तू माझ्या पापावर पहारा ठेवणार नाहीस. 17 माझा अपराध पिशवीत बंद करून शिक्का मारला जाईल, आणि तू माझे दुष्कर्म झाकून टाकशील.
18 पण जसा पर्वत कोसळतो आणि ढासळून जातो, आणि खडक आपल्या जागेवरून हलवला जातो, 19 जसे पाणी दगडांना झिजवते आणि त्याचे लोंढे माती वाहून नेतात भूमीची, तसे तू मनुष्याची आशा नष्ट करतोस. 20 तू त्याला सदासर्वकाळ पराभूत करतोस, आणि तो निघून जातो; तू त्याचा चेहरा विद्रूप करतोस आणि त्याला दूर पाठवतोस. 21 त्याच्या मुलांना मान मिळतो, पण त्याला ते कळत नाही; त्यांना नीच केले जाते, पण त्याच्या ध्यानात येत नाही. 22 त्याला केवळ आपल्या स्वतःच्या देहाची वेदना जाणवते, आणि तो केवळ स्वतःसाठी शोक करतो.