64 1 अरे, तू आकाश फाडून खाली उतरावेस, म्हणजे तुझ्या उपस्थितीने पर्वत थरथर कापावेत— 2 जसा अग्नी काटक्या धगधगून पेटवतो व पाणी उकळवतो—म्हणजे तू आपल्या शत्रूंना आपले नाव कळवावेस, आणि तुझ्या उपस्थितीने राष्ट्रे थरथर कापावीत! 3 तू आम्ही अपेक्षा न केलेली भयचकित करणारी कृत्ये केलीस, तेव्हा तू खाली उतरलास, आणि तुझ्या उपस्थितीने पर्वत थरथरले. 4 प्राचीन काळापासून, कोणीही ऐकले नाही किंवा जाणले नाही कानाने; तुझ्यावाचून कोणत्याही डोळ्याने दुसरा कोणी पाहिला नाही— तू, जो आपली वाट पाहणाऱ्यासाठी कार्य करतोस. 5 जे आनंदाने न्याय्य ते करतात त्यांचे तू स्वागत करतोस, जे तुझ्या मार्गांनी चालताना तुझी आठवण ठेवतात. पण तू रागावलास, आणि आम्ही पाप केले; फार काळ आम्ही आपल्या पापांत राहिलो—आम्ही तारले जाऊ का? 6 आम्ही सगळे अशुद्ध झालेल्यासारखे झालो आहोत, आणि आमची सर्व नीतिमत्तेची कृत्ये मलिन वस्त्रासारखी आहेत. आम्ही सगळे पानासारखे कोमेजतो, आणि आमची पापे वाऱ्यासारखी आम्हांला वाहून नेतात. 7 तुझ्या नावाने हाक मारणारा कोणी नाही, जो स्वतःला उठवून तुला घट्ट धरील असा कोणी नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवलेस आणि आम्हांला आमच्या पापांच्या स्वाधीन केलेस.
8 पण आता, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, आणि तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सगळे तुझ्या हाताचे काम आहोत. 9 हे आमच्या पित्या, इतका भयंकर रागावू नकोस, आणि आमचे पाप सर्वकाळ लक्षात ठेवू नकोस. पाहा, कृपया—आम्ही सगळे तुझे लोक आहोत. 10 तुझी पवित्र नगरे ओसाड रान झाली आहेत; सीयोन ओसाड रान झाले आहे, यरुशलेम उजाड झाले आहे. 11 आमचे पवित्र आणि सुंदर मंदिर, जिथे आमच्या पूर्वजांनी तुझी स्तुती केली, ते अग्नीने जाळले गेले आहे, आणि आम्ही जे जे मौल्यवान मानले ते सगळे भग्नावशेष झाले आहे. 12 हे आमच्या पित्या, या सगळ्यानंतरही तू आवरून धरशील का? तू शांत राहून आम्हांला इतके भयंकर पीडा देशील का?