उपासनेत आदर व सुव्यवस्था
11 1 जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो, तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.
2 आता मी तुमची प्रशंसा करतो, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझी आठवण ठेवता आणि मी तुम्हांला दिलेल्या परंपरा जशाच्या तशा पाळता. 3 आता तुम्ही हे जाणावे अशी माझी इच्छा आहे: प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक आमचा पिता आहे. 4 जो पुरुष मस्तक झाकून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा अनादर करतो. 5 पण जी स्त्री मस्तक न झाकता प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा अनादर करते—ते मुंडन केल्यासारखेच आहे. 6 जर एखादी स्त्री आपले मस्तक झाकण्यास नकार देत असेल, तर तिचे केस कापून टाकावेत; पण स्त्रीने केस कापणे किंवा मुंडन करणे लज्जास्पद असल्यामुळे तिने आपले मस्तक झाकावे. 7 पुरुषाने आपले मस्तक झाकू नये, कारण तो आमच्या पित्याची प्रतिमा व गौरव आहे; तर स्त्री ही पुरुषाचे गौरव आहे. 8 कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली. 9 तसेच पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. 10 म्हणून देवदूतांमुळे स्त्रीच्या मस्तकावर अधिकाराचे चिन्ह असावे.
11 तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषावाचून नाही, आणि पुरुषही स्त्रीवाचून नाही. 12 कारण जशी स्त्री पुरुषापासून झाली, तसा पुरुषही स्त्रीद्वारे होतो; आणि सर्व काही आमच्या पित्यापासून आहे. 13 तुम्हीच स्वतः ठरवा: स्त्रीने मस्तक न झाकता आमच्या पित्याची प्रार्थना करणे योग्य आहे का? 14 पुरुषाला लांब केस असणे त्याला अपमानास्पद आहे, हे निसर्गच तुम्हांला शिकवीत नाही का, 15 पण स्त्रीला लांब केस असतील तर ते तिचे गौरव आहे, कारण तिचे केस तिला आच्छादनासाठी दिले आहेत. 16 जर कोणी वाद घालण्यास प्रवृत्त असेल, तर आमच्यात असा रिवाज नाही, आणि आमच्या पित्याच्या मंडळ्यांतही नाही.
प्रभूच्या मेजाचा अनादर
17 ही आज्ञा देताना मी तुमची प्रशंसा करीत नाही, कारण तुम्ही एकत्र येता ते चांगल्यासाठी नव्हे तर वाईटासाठी. 18 कारण पहिली गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही मंडळी म्हणून एकत्र जमता, तेव्हा तुमच्यात फूट आहे असे मी ऐकतो, आणि काहीसे मी त्यावर विश्वासही ठेवतो. 19 कारण तुमच्यातील खरे कोण हे उघड व्हावे म्हणून तुमच्यात मतभेद असणे भागच आहे. 20 तर मग, तुम्ही एका ठिकाणी एकत्र जमता तेव्हा तुम्ही जे खाता ते प्रभुभोजन नव्हे. 21 कारण खाताना प्रत्येक जण आपले स्वतःचे भोजन घाईघाईने पुढे घेतो—एक उपाशी राहतो, तर दुसरा मद्याने धुंद होतो. 22 खाण्यापिण्यासाठी तुम्हांला घरे नाहीत का? की तुम्ही आमच्या पित्याच्या मंडळीला तुच्छ मानता आणि ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लज्जित करता? मी तुम्हांला काय म्हणू? तुमची प्रशंसा करू? यासाठी मी तुमची प्रशंसा करीत नाही.
23 कारण जे मी तुम्हांला दिले तेच मी प्रभूकडून प्राप्त केले होते: प्रभू येशूने, ज्या रात्री त्याला धरून दिले गेले त्या रात्री, भाकर घेतली,
24 आणि उपकारस्तुती केल्यावर ती मोडून म्हणाला, “हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी आहे; माझ्या आठवणीसाठी हे करा.” 25 त्याचप्रमाणे भोजनानंतर त्याने प्यालाही घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तातील नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तो पिता, तेव्हा माझ्या आठवणीसाठी हे करा.”
26 कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तेव्हा तुम्ही प्रभूच्या मृत्यूची घोषणा त्याच्या येण्यापर्यंत करता.
27 म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने ही भाकर खातो किंवा प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूच्या शरीराचा व रक्ताचा अपराधी ठरतो. 28 प्रत्येकाने स्वतःची परीक्षा करावी, आणि मग ही भाकर खावी व हा प्याला प्यावा. 29 कारण जो शरीराची पारख न करता खातो व पितो, तो स्वतःवर दंड ओढवून खातो व पितो. 30 याच कारणामुळे तुमच्यात पुष्कळ जण अशक्त व आजारी आहेत, आणि कितीतरी जण निजले आहेत. 31 पण जर आपण स्वतःची योग्य पारख केली, तर आपला न्याय होणार नाही. 32 जेव्हा प्रभू आपला न्याय करतो, तेव्हा तो आपल्याला शिस्त लावतो, यासाठी की जगाबरोबर आपला दोषनिर्णय होऊ नये. 33 तर मग, माझ्या बंधुभगिनींनो, तुम्ही खाण्यासाठी एकत्र येता तेव्हा एकमेकांची वाट पाहा. 34 जर कोणी भुकेला असेल, तर त्याने घरीच खावे, यासाठी की तुमचे एकत्र येणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टी मी आल्यावर सोडवीन.